तोच खेळ नव्याने
माझं मन मांडतंय पुन्हा
तोच खेळ नव्याने...
सगळं काही शांत असताना
अचानक तो आला आयुष्यात,
त्यानेच जाणीव करून दिली की
मी शांत दिसते फक्त वरून-वरून.
माझंही मला कळलं नाही
हा असा काय म्हणतोय?
माझ्याही नकळत माझी
उत्सुकता का ताणतोय?
तो म्हणाला, तू शांत दिसण्याचा छान प्रयत्न करतेस
पण तेवढीच तुझ्या मनातील वाढतेय तगमग,
चेहरा शांत दिसत असला तरीही
तुझ्या डोळ्यात दिसतेय वेगळीच तडफड.
अंतर्मुख होऊन विचार केला
हा तर खरंच बोलतोय,
पण सोबती नसल्याचं
हा का दु:ख छेडतोय?
तो म्हणाला, तुला एकटी बघून वाटलं
तुझ्यासोबत दोन पावलं चालावं,
मनात कोंडून ठेवलेलं
सारं तुझ्याशी बोलावं.
त्याचं बोलणं ऐकून
मनाला घातलेला बांध फुटला,
एकटं वाटत असतानाच
एक छानसा सोबती भेटला.
सगळं यापूर्वीचं आठवून वाटलं
ही सोबतही नसेल आयुष्यभर, तरीही...
माझं मन मांडतंय पुन्हा
तोच खेळ नव्याने...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें