आपलं नातं
एका निवांत क्षणी बसल्यावर
तू विचारलंस मला,
तुमच्या आयुष्यात माझं स्थान काय?
तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे?
उत्तर देण्याआधी मी क्षणभर थबकलो
माझ्या मनाचा धांडोळा घेत राहिलो,
माझे विचार माझ्याभोवतीच
फिरत राहतात वादळाप्रमाणे
इकडून तिकडे, तिकडून इकडे,
कधी-कधी कुठल्याही दिशेने.
मी तुला पूर्णपणे आपलं मानतो
तुझ्याशिवाय माझ्या अस्तित्त्वाची कल्पना करणंही
असतं मला अशक्य,
तर कधी वाटतं
आपलं नातं छान, पण एक सिस्टीम आहे
आणि ते निभावण्याचा
प्रयत्न करतो आपण दोघेही,
त्यातून गरज भागते
तुझीही आणि माझीही
तर कधी वाटतं
तू माझ्यापेक्षा खूप वेगळी आहेस,
आपण एकमेकांपेक्षा सर्वस्वी भिन्न आहोत,
कित्येकदा तुला माझ्या काही गोष्टी
आणि मला तुझ्या काही गोष्टी नाही पटत.
प्रश्न एकच असला तरीही
उत्तराचं रुप बदलत राहतं खरं तर,
एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया
चालत राहणार निरंतर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें