तुझ्याचसाठी.............
तुझ्याचसाठी जपुन ठेवली, श्रावणातली रम्य पहाट
झाडाझुडूपाने वेढलेली, नागमोडी पाउलवाट ॥१॥
श्वासागणिक जपुन ठेवली, आठवण तुझ्याच प्रेमाची
तुझ्याचसाठी जपुन ठेवली, ऊब गुलाबी थंडीतली ॥२॥
तुझ्याचसाठी जपुन ठेवले, वाळूवरले पुसट घाव
आपल्यासाठीच बांधलेले, स्वप्नातील ते सुंदर गाव ॥३॥
तुझ्याचसाठी जपुन ठेवला, ओल्या मातीमधला सुवास
आयुष्याच्या वाटेवरला, दोघांचाच तो सुंदर प्रवास ॥४॥
तुझ्याचसाठी आहे जपले, गुज अबोल प्रितीचे
नितळनिळ्या आभाळातले, सप्तरंग इंद्रधनुचे ॥५॥
ह्रदयात साठवुन ठेवलेले, हास्य तुझ्या ओठांवरले
तुझ्याचसाठी जपुन ठेवले, गवसलेले ह्रदय माझे ॥६॥
-गुलाब ढाकणे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें